सत्तासुंदरी मिळवण्यासाठी फडणवीस उतावळे झालेत – एकनाथराव खडसे

एप्रिल 23, 2022 8:28 PM

khadse fadanvis

जळगाव लाईव्ह न्यूज | २३ एप्रिल २०२२ | महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. सत्तासुंदरी मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस उतावळे झाले असून यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने दबावतंत्र वापरत आहेत. असा घणाघात एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या भाषणात केला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी एकनाथराव खडसे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, संपूर्ण देशाला महागाईने व्यापला आहे. तेलापासून, मिठापासून ते थेट डाळी पर्यंत सर्वच गोष्टी महाग झाल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत सरकार आता स्थिर झाला असल्याने देवेंद्र फडणवीस पर्यायाने भारतीय जनता पक्ष दबावतंत्राचा वापर करतोय.

मी भारतीय जनता पक्षात असतानाही 67 दिवस माझा फोन टॅप केला. तर दुसरीकडे माझा कार्यकर्ता अशोक लाडवंजारीचा देखील फोन त्यांनी टॅप केला. अशा घाणेरड्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरु आहे. आपल्या सगळ्यांना त्याच्या विरोधात आवाज उठवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला महागाई विरोधात आवाज उठवायचा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now