Yawal : ऐन काढणीच्या वेळी बागेतून १५ क्विंटल केळी लंपास ; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

जुलै 6, 2026 11:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे शेतीमधील साहित्य चोरीच्या घटना वाढत असताना त्यातच आता यावल तालुक्यातील आमोदा शिवारात अज्ञात चोरट्यांनी थेट शेतकऱ्याच्या केळीच्या बागेवरच डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बागेतून तब्बल १५ क्विंटल केळी कापून लंपास केली आहे. ऐन काढणीच्या वेळेस कष्टाचे पीक चोरीला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्गात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banana

फिर्यादी जितेंद्र दिनकर कोल्हे (वय ४५, रा. त्रिमूर्ती चौक, फैजपूर) यांच्या मालकीच्या आमोदा शिवारातील गट क्रमांक २०५ मधील केळीच्या बागेत अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रवेश केला. त्यानंतर सुमारे ७० ते ८० केळीचे घड कापून नेले. चोरीस गेलेल्या केळीची अंदाजे किंमत ३० हजार रुपये असल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी ही चोरी नियोजनबद्ध पद्धतीने केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. शेतीमाल तयार होताच अशा प्रकारे चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोती पवार करीत असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयित हालचाली आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे तपासाची चक्रे फिरविण्यात येत आहेत.

दरम्यान, ग्रामीण भागात शेतीमाल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने रात्रीची पोलीस गस्त वाढवावी आणि शेतकऱ्यांच्या पिकांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now