जळगाव विधान परिषदेत नंदकिशोर महाजनांचा विक्रमी विजय

जून 22, 2026 10:33 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जून २०२६ । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे तथा भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन विक्रमी मतांनी विजयी झाले आहे.

nandu mahajan

यंदाची जळगाव विधान परिषद निवडणूक अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरली होती. महायुतीत ही जागा भाजपकडे जाणार की शिवसेनेकडे, यावरून सुरुवातीला मोठी राजकीय रस्सीखेच पाहायला मिळाली. अखेर भाजपने अनेक इच्छुकांना मागे टाकत रावेर लोकसभा क्षेत्राचे प्रमुख नंदकिशोर महाजन यांच्यावर विश्वास दाखवत उमेदवारी जाहीर केली.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडून शरद तायडे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा कुंदन काळे यांनीही अर्ज दाखल केल्याने सुरुवातीला चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले होते. मात्र निवडणुकीच्या प्रक्रियेआधी काही उमेदवार प्रभावी स्पर्धेत राहू शकले नाहीत आणि मुख्य सामना महाजन व तायडे यांच्यात रंगला.

१८ जून रोजी झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण ६३० मतदारांपैकी ६१६ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी तब्बल ९७ टक्क्यांहून अधिक राहिली. आज सोमवारी (२२ जून) जळगाव येथील अल्पबचत भवनात सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. बॅलेट पेपरद्वारे झालेल्या या निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी होताच नंदकिशोर महाजन यांनी मोठी आघाडी घेतली.

त्यांना तब्बल ५८२ मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांना १७ मते मिळाली. अन्य उमेदवारांमध्ये अनिल चौधरी यांना ११ आणि रेश्मा कुंदन काळे यांना १ मत मिळाले. निवडणुकीत ५ मते अवैध ठरली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now