जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोरदार कमबॅक करत अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असल्याचा इशारा दिला असून, राज्यातील अनेक जिल्ह्यांना ‘रेड’, ‘ऑरेंज’ आणि ‘यलो’ अलर्ट जारी केला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यासाठी आजपासून पुढील दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

जून महिन्याच्या अखेरीस जळगाव जिल्ह्यात पावसाने ओढ दिली होती, त्यामुळे ३२ टक्क्यांची मोठी तूट निर्माण झाली होती. मात्र, जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे ही तूट आता १९ टक्क्यांवर आली आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यात तब्बल ४० मिमी पाऊस झाला असून, यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्यात ५ जुलैपर्यंत सरासरी १५४ मिमी पाऊस अपेक्षित असतो, त्यापैकी १२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच सरासरीच्या ८१ टक्के पाऊस झाला आहे.

एल निनो’चे संकट घोंगावत असतानाही पावसाने दिलेल्या या दिलासादायक साथीमुळे जिल्ह्यातील ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केली असली, तरी हवामान तज्ज्ञांनी पुढील काळासाठी सावधगिरीचा इशारा दिला आहे. हवामान तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, ९ जुलैनंतर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. ‘एल निनो’च्या संकटामुळे यंदाच्या पावसाळ्यात असे खंड पाहायला मिळू शकतात. या काळात काही भागांत अधूनमधून सरी कोसळतील. मात्र, ‘एल निनो’चा सर्वाधिक परिणाम ऑगस्ट महिन्यात जाणवेल, ज्यामुळे ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या सरासरीत मोठी घट होऊ शकते. त्यामुळे आता जुलै महिन्याच्या आगामी आठवड्यांमध्ये पाऊस कसा राहतो, यावरच पेरणी झालेल्या पिकांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
आगामी दोन दिवसांसाठी हवामान विभागाचा अलर्ट (जिल्हानुसार)
आजचा इशारा
रेड अलर्ट (अतिवृष्टीचा इशारा): ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट.
ऑरेंज अलर्ट (मुसळधार पाऊस): पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक.
यलो अलर्ट : पुणे, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम, यवतमाळ.
उद्याचा इशारा
रेड अलर्ट: रायगड.
ऑरेंज अलर्ट: पालघर, रत्नागिरी, नाशिक घाट, पुणे घाट.
यलो अलर्ट: ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, कोल्हापूर घाट, सातारा घाट, अकोला, अमरावती, बुलढाणा, धुळे, वाशीम, यवतमाळ.








