जळगाव लाईव्ह न्यूज । शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील ६ खासदारांच्या कथित बंडखोरीनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिकाही सुरू झाली आहे. दरम्यान भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली होती. या टीकेला आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत कडाडून उत्तर दिलं आहे. “जामनेरच्या या मावशीबाईला काँग्रेसचा एवढा तिटकारा का?” असा थेट आणि धारदार सवाल राऊत यांनी गिरीश महाजनांना विचारला आहे.

काय म्हणाले होते गिरीश महाजन?
ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीवरून मंत्री गिरीश महाजन यांनी टोला लगावला होता की, “संजय राऊत बोलतात की फोडून काढू. पण फोडून काढायला सोबत माणसं तर पाहिजेत ना? आता ते पहिले दिवस गेले. जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता, ते दिवस आता राहिले नाहीत. आता शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसली आहे आणि राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांच्या मागे-मागे फिरत आहे. याच कारणांमुळे तुमचे खासदार तुम्हाला सोडून जात आहेत.”

महाजनांच्या या विधानाचा समाचार घेताना संजय राऊत चांगलेच भडकले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “काल ते जळगावच्या, जामनेरच्या मावशीबाई सांगत होते की शिवसेना काँग्रेसच्या मांडीवर बसल्यामुळे हे सहा लोक सोडून गेले. अरे मावशे… त्या तमाशातील मावश्या असतात ना, तशा या भाजपमध्ये आहेत! महाविकास आघाडीत काँग्रेस आहे, आम्ही आहोत. त्यांच्याच मदतीने हे सहा खासदार निवडून आले ना? मग तेव्हा त्यांना माहीत नव्हतं का की महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे? हे माहीत असूनही ते निवडून आले आणि आता मोठी मोठी भाषणं ठोकतायत.”
काँग्रेसच्या योगदानावर बोलताना राऊत पुढे म्हणाले, “या जामनेरच्या मावशीबाईला काँग्रेसचा एवढा तिटकारा का आहे? या देशाला काँग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळालं. काँग्रेसचे लोक तुरुंगात गेले, क्रांतिकारक झाले, त्यांनी देशासाठी प्राणांचा त्याग केला. तुमच्या भाजपमध्ये असं कोणी आहे का? आम्हाला सांगा. उगाच दुसऱ्यांना नावं ठेवू नका.” असंही संजय राऊत म्हणाले..








