जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला आज (दि २२) सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवन येथे अत्यंत चुरशीच्या वातावरणात सुरुवात झाली. महायुतीचे नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यात सरळ आणि थेट लढत झाल्याने, जळगावचा ‘नवा आमदार’ कोण होणार? याचा फैसला काही तासांतच स्पष्ट होईल.

मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने अल्पबचत भवन आणि परिसर छावणीत रूपांतरित केला आहे. कडेकोट पोलीस बंदोबस्तासह संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कडक निगराणीखाली पार पडत आहे.

या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण ६३० मतदार पात्र होते. त्यापैकी ६१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत सुमारे ९७.७८ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. विजयी होण्यासाठी उमेदवाराला किमान ३१६ प्रथम पसंतीची मते मिळणे आवश्यक आहे. मतमोजणीपूर्वी सर्व मतदान केंद्रांवरील मतपेट्यांमधील बॅलेट पेपर एकत्रित करण्यात आले. त्यानंतर ५०-५० मतांच्या गटात वर्गीकरण करून तीन टेबलवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा करण्यात येत असला, तरी मतदारांनी नेमका कौल कुणाच्या पारड्यात टाकला आहे, याचे चित्र काही तासांत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे.











