जळगावात महायुतीधर्म पाळणाऱ्या एकनाथ शिंदेंना नाशिकमध्ये झटका

जून 22, 2026 12:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल समोर आले आहे. यामध्ये सत्ताधारी महायुतीने एकतर्फी वर्चस्व गाजवत दणदणीत विजय मिळवला आहे. यात मात्र नाशिकच्या निकालांने राज्याच्या राजकारणात नवा भूकंप घडवून आणला आहे. जळगावमध्ये महायुतीने एकजुटीचे प्रदर्शन करत दणदणीत विजय मिळवला असला, तरी नाशिकच्या निकालाने मात्र युतीधर्मावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जळगावात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने प्रामाणिकपणे ‘युतीधर्म’ पाळला, मात्र नाशिकमध्ये भाजप आपल्या मित्रपक्षाला सांभाळण्यात अपयशी ठरली की तिथे ‘गेम’ केला गेला? असा संतप्त सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

nsk

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी ५८२ मते मिळवून विक्रमी विजय नोंदवला. या विजयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे निवडणुकीपूर्वी जळगावात शिंदे गटाच्या नेत्या रेश्मा काळे यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले होते. मात्र, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीनंतर, पक्षादेश मानत त्यांनी माघार घेतली. दुसरीकडे अपक्ष उमेदवारी दाखल करत अनिल चौधरी देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर अनिल चौधरी यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. जळगावचा निकाल हा ‘शिंदे गटाने’ पाळलेल्या युतीधर्माचे थेट प्रतीक मानला जात आहे.

जळगावच्या अगदी उलट चित्र नाशिकमध्ये पाहायला मिळाले. नाशिकची जागा महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेला सुटली होती आणि नरेंद्र दराडे हे अधिकृत उमेदवार होते. मात्र, भाजपचे स्थानिक बंडखोर नेते गोकुळ गीते यांनी पक्षाला आव्हान देत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी नाकदुऱ्या काढूनही गीतेंनी माघार घेतली नाही. अखेर मतमोजणीत गोकुळ गीते यांनी ३८९ मते घेत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराचा धुव्वा उडवला. नाशिकमधील भाजपची मोठी ताकद पाहता, ही मते नेमकी कुणाच्या छुप्या पाठिंब्याने वळली, याबाबत आता संशय व्यक्त केला जात आहे.

खरंतर निवडणुकीपूर्वी जळगाव आणि नाशिक या दोन्ही जागांच्या बंडखोरीचा तिढा एकमेकांशी जोडला गेला होता. नाशिकमधील भाजपचे बंडखोर माघार घेतील, याच अटीवर जळगावमध्येही माघार घेणार असल्याचे शिंदे गटाच्या बंडखोर रेश्मा काळे म्हणाल्या होत्या. मात्र नाशिकमध्ये माघारीची घोषणा झाल्यानंतर जळगावातही रेश्मा काळेंनी एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर माघार जाहीर केली होती.

जळगावमध्ये शिवसेनेने आपला शब्द पाळला आणि भाजपचा उमेदवार सुसाट निवडून आणला. मात्र, नाशिकमध्ये भाजप आपल्या बंडखोराला रोखू शकली नाही की त्यांनी दराडेंचा गेम होऊ दिला? यावरून आता शिवसेनेच्या गोटात तीव्र नाराजी आहे. एकाच दिवशी लागलेल्या या दोन टोकांच्या निकालांमुळे महायुतीमध्ये आनंदापेक्षा संशयाचे धुके अधिक दाट झाले आहे.

“आम्ही जळगावात प्रामाणिक राहिलो, मग नाशिकमध्ये आमच्या पाठीत खंजीर का खुपसला?” असा सुप्त सूर शिवसेना कार्यकर्त्यांमधून निघत असून आगामी निवडणुकांमध्ये नाशिकमधील हा ‘अविश्वास’ महायुतीला आगामी काळात खूप महाग पडू शकतो, असेच संकेत या निकालातून मिळत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now