जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२२ । जळगाव शहरासह संपूर्ण परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्या पावसाच्या सरींनी वातावरणात आल्हासीत झाले आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने आनंदाची लाट उसळली आहे. पहिल्या पावसानं सगळं चिंब चिंब होऊन गेलंय… पावसाळा नेमेचि येतो, पण तरीही दरवर्षी येणारा पहिला पाऊस पहिल्यांदाच नव्यानं भेटतो.आज जळगावकरांनी याच पावसाचा आस्वाद घेतला.
जळगाव शहरासह परिसरात आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास २५ मिनिटं जोरदार पाऊस झाला आहे. या यामुळे जागोजागी साचलेल पाणी दिसून आले. गेल्या महिन्यात तापमानाने जळगावकर चांगलेच हैराण झाले होते. मात्र राज्यात अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे.जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचे ढग दाटून येत आहे. हवामान खात्याने आधीच पावसाचा अंदाज वर्तविला होता. जळगाव जिल्ह्याला आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. त्यामुळे आज दुपारी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
पहिला पाऊस आनंदाचा वर्षाव घेऊन येतो… वाजतगाजत आणि धसमुसळेपणा करत येतो… पहिल्या पावसातला मातीचा गंध वातावरण सुगंधी करून टाकतो… पावसाच्या थेंबासाठी आसुसलेल्या चातक पक्षाची तहान भागवतो… आणि आभाळाकडं डोळं लावून बसलेल्या बळीराजाची प्रतीक्षा संपवतो. ग्रीष्माच्या उन्हानं होरपळलेली धरित्री पहिल्या पावसाच्या शिडकाव्यानं मोहरून जाते… आणि शहरातला काळा डांबरी रस्ताही गारेगार होऊन जातो… पहिल्या पावसाच्या आगमनानं मनात आठवणींचे ढग फेर धरून नाचू लागतात… पहिल्या पावसाचे टपोरे थंब चेहऱ्यावर स्मितहास्याची लकेर उमटवतात.