⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

जैन इरिगेशन स्पोर्ट्स ॲकडमी’तर्फे राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक स्पर्धेचे आयोजन


जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुद्धिबळ संघटना व जैन स्पोर्टर्स ॲकॕडमी येत्या ८ ते १३ एप्रिल दरम्यान राष्ट्रीय बुद्धिबळ सांघिक अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करीत आहे. ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे असणार असल्याची माहिती शहरातील कांताई सभागृह येथे पत्रकार परिषद देण्यात आली.


पुरुष गटामध्ये एलआयसी ऑफ इंडिया, ऑल इंडिया रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड आरएसपीबीटीम, तामिळनाडू संघ, आंध्र संघ, बिहार, केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आदी संघांनी सहभाग निश्चित केला आहे. तर महिला गटामध्ये आंध्र, गुजरात, ओडिसा, बिहार, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आदी राज्य संघ तर पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाचा संघ देखील स्पर्धेत सहभागी असेल.

स्पर्धा सांघिक स्विस पद्धतीने खेळविली जाणार असून ग्रॅन्डमास्टर विसाख, दीपण चक्रवर्ती, स्वप्नील धोपाडे, तेजकुमार, आर आर लक्ष्मण, श्रीराम झा, आंतरराष्ट्रीय मास्टर विघ्नेश, श्याम निखिल, अर्घ्यादिप दास, सी आर जी कृष्णा, सायंतन दास, दिनेश शर्मा पुरुष गटात तर महिला गटात, महिला ग्रँडमास्टर स्वाती घाटे, किरण मनीषा मोहंती, मेरी गोम्स, दिव्या देशमुख, आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामिनाथन, पद्मिनी राऊत, ईशा करवडे, निशा मोहोता, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर प्रणाली धारिया साक्षी चीतलांगे, तेजस्विनी सागर, महिला फिडे मास्टर बोमिनी मोनिका अक्षया, तोषाली, महिला कँडिडेत मास्टर वैष्णवी आदी खेळाडू सहभागी आहेत.

राष्ट्रीय दर्जाची स्पर्धा जळगावमध्ये आयोजीत होत असल्याने जळगावसह महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. अशा स्पर्धांतून खेळले जाणारे डाव अतिशय चुरशीचे व उत्कंठावर्धक असतील यात शंका नाही. स्पर्धेतील प्रत्येक डावाचा कालावधी ९० मिनिटे व प्रत्येक चालीसाठी ३० सेकंद वाढीव वेळ राहणार आहे. अशा दिग्गज खेळाडूंचे डाव अनुभवायची संधी या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम बुद्धिबळ प्रेमींना मिळणार आहे.