जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यातील विविध बस स्थानकांवर प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे मंगळसूत्र, पोत आणि सोन्याची चैन लांबवणाऱ्या एका सराईत चोरट्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने जळगाव बसस्थानकातून मुसक्या आवळल्या आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ५९ हजार रुपये किमतीचे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केले असून, याद्वारे ३ गुन्हे उघडकीस आले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बस स्थानकांवर सोन्याचे दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना अज्ञात आरोपींचा शोध घेण्याबाबत आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विविध बस स्थानकांवर साध्या वेषात गस्त घालत होते.

अशी झाली कारवाई:
दिनांक १२ सप्टेंबर २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री. संतोष पवार व त्यांचे पथक जळगाव शहरातील मुख्य बस स्थानकावर गस्त घालत असताना, त्यांना एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळला. पथकाने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपले नाव सागर दादासाहेब जाधव (वय 31, रा. खर्डे, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे सांगितले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता बॅगेमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले.
दागिन्यांबाबत पोलिसांनी सखोल चौकशी केली असता संशयिताने वेगवेगळ्या बसस्थानकांवर चोरी केल्याची माहिती दिली. सुमारे महिनाभरापूर्वी मुक्ताईनगर बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पोत, सुमारे 15 दिवसांपूर्वी एरंडोल बसस्थानकावर एका व्यक्तीच्या गळ्यातील सोन्याची चेन, तर 10 ते 12 दिवसांपूर्वी जामनेर बसस्थानकावर दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या पोती चोरी केल्याचे त्याने सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क साधून माहितीची पडताळणी केली. त्यावेळी या तीनही घटनांबाबत गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले.
4 लाख 59 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
आरोपी सागर जाधव याच्याकडून तिन्ही गुन्ह्यांतील 27 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अंदाजे किंमत 4 लाख 59 हजार रुपये, हस्तगत करण्यात आले आहेत. चोरीस गेलेल्या दागिन्यांचे वर्णन आणि आरोपीकडून मिळालेल्या दागिन्यांचे वर्णन जुळत असल्याचे पोलिसांनी सांगितले. हस्तगत केलेला मुद्देमाल एरंडोल पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, बापू रोहोम आणि नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी हरिलाल पाटील, विलेश सोनवणे, राहुल बैसाने, राहुल कोळी, विकास गायकवाड, गोपाळ पाटील आणि प्रमोद ठाकूर यांच्या पथकाने केली. पुढील तपास एरंडोल पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.









