जळगाव लाईव्ह न्यूज । एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण सुरू असतानाच जळगाव शहरातून एक अत्यंत दुर्दैवी व हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शहरातील जुने जळगाव परिसरातील तळेले कॉलनीत २४ वर्षीय आई आणि तिच्या ५ वर्षीय चिमुकल्या मुलाचा संशयास्पद किंवा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हेमांगिनी निखील महाजन (वय २८ वर्षे) असे आईचे नाव असून त्यांच्या ५ वर्षांच्या मुलाचे नाव शौर्य असे आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड हळहळ आणि शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जुने जळगावजवळील तळेले कॉलनीतील विघ्नहर्ता चौकाजवळ महाजन कुटुंबीय वास्तव्यास आहे. मृत हेमांगिनी यांचे पती निखील महाजन हे भारतीय सैन्य दलात कार्यरत असून सध्या त्यांची राजस्थान येथे सेवा बजावत आहेत. तळेले कॉलनी येथील घराच्या तळमजल्यावर निखील महाजन यांचे कुटुंब तर पहिल्या माळ्यावर त्यांचे भाऊ अक्षय महाजन राहतात.

दरम्यान, सोमवारी दुपारी हेमांगिनी महाजन या मुलगा शौर्य याच्यासह घरात होत्या, तर कुटुंबातील इतर सदस्य वरच्या माळ्यावर होते. सायंकाळच्या सुमारास निखील महाजन यांच्या आई खाली आल्या असता, अनेकदा हाका मारूनही घरातून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी लागलीच कुटुंबातील इतर सदस्यांना बोलावले असता ही दुर्दैवी घटना उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. महाजन कुटुंबीय परिसरात सर्वांशी मिळून-मिसळून राहणारे असल्याने या घटनेने स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, शनिपेठ पोलीस सर्व कोनातून अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या तपासानंतरच या मृत्यूचे खरे कारण समोर येऊ शकेल. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे महाजन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण जुने जळगाव परिसरात शोककळा पसरली आहे.






