जळगाव लाईव्ह न्यूज । १८ सप्टेंबर २०२६ । एकीकडे जळगाव जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच वरुणराजाने पाठ फिरवली आहे. त्यातच उकाडा आणि दमट वातावरणाचा त्रास वाढू लागला आहे.सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, वातावरणातील आर्द्रतेमुळे दुपारच्या वेळी उष्णतेचा चटका अधिक जाणवत आहे.

दरम्यान, दिवसभरातील उष्णतेमुळे दुपारनंतर बाष्पयुक्त ढग तयार होऊन सायंकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.यामुळे जळगावकरांना पुढील पाच दिवस सकाळी कडक ऊन व उकाडा तर संध्याकाळी पावसाच्या सरी अशा दुहेरी वातावरणाचा अनुभव घ्यावा लागणार आहे.

गणरायाच्या आगमनापूर्वी जळगाव जिल्ह्यात पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. सोबतच बऱ्याच दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना या पावसामुळे मोठा आधार मिळाला होता. मात्र यांनतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली असून दुसरीकडे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे जळगावकर सध्या असह्य उकाड्याने त्रस्त आहेत. काल १७ सप्टेंबर रोजी वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण तब्बल ७१ टक्क्यांवर नोंदवले गेले. तर कमाल तापमानाचा पारा ३३ अंशापर्यंत होता.
मुसळधार पावसाची शक्यता कमी
हवामान विभागाच्या माहितीनुसार, आगामी काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होऊन पारा ३५ अंशांपर्यंत पोहोचू शकतो. सध्यातरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता मावळली असून केवळ स्थानिक पातळीवर हलक्या ते मध्यम सरी कोसळतील. मात्र २२ ते २६ सप्टेंबरदरम्यान पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता असल्याने त्या काळात पावसाची आशा अजुनही कायम आहे. सध्या विचित्र आणि सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम दिसून येत आहे.
आगामी पाच दिवस वातावरण कसे राहणार?
दिनांक, तापमान आणि हवामानाची स्थिती
१८ सप्टेंबर : ३४ अंश.. दमटपणा, सायंकाळनंतर मध्यम ते हलका पाऊस
१९ सप्टेंबर : ३४ अंश..ढगाळ वातावरण, दमटपणा जाणवणार
२० सप्टेंबर : ३४ अंश..दमटपणा, सायंकाळनंतर मध्यम ते हलका पाऊस
२१ सप्टेंबर : ३५ अंश..दमटपणा, सायंकाळनंतर मध्यम ते हलका पाऊस
२२ सप्टेंबर : ३५ अंश.. ढगाळ वातावरण, दमटपणा जाणवणार






