जळगाव लाईव्ह न्यूज । सायबर भामट्यांकडून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून नागरिकांना गंडा घेतला जात असल्याचे प्रमाण दिवसेंदिवस समोर येत असून असाच एक प्रकार जळगावातून समोर आला आहे. मोबाइल रिचार्ज अपडेट करण्याचे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने सेवानिवृत्त वृद्धाची मुदत ठेव प्री-मॅच्युअर करून तब्बल १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रमेश नारायण पाटील (वय ७४, रा. महाबळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमका काय आहे प्रकार?
रमेश पाटील यांना एका सायबर भामट्याने व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधला. मोबाइल रिचार्ज अपडेट करण्यासाठी गुगलवर जाऊन ‘रिचार्ज अपडेट’ असे टाइप करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर डेबिट कार्डची माहिती भरल्यास रिचार्ज अपडेट होईल, असे सांगून भामट्याने त्यांचा विश्वास संपादन केला. भामट्याच्या सांगण्याप्रमाणे प्रक्रिया केल्यानंतर पाटील यांच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्याशी जोडलेल्या नेटबँकिंगचा ताबा आरोपीने मिळवला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

यानंतर ९ आणि १० सप्टेंबरदरम्यान आरोपीने पाटील यांच्या खात्यात असलेल्या मुदत ठेवींवर डल्ला मारला. या ठेवी मुदतीपूर्वीच परस्पर मोडण्यात आल्या आणि त्यातून मिळालेली तब्बल १० लाख रुपयांची रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली.खात्यातून मोठी रक्कम परस्पर वळती झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी तातडीने सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करीत आहेत.
रिचार्जच्या नावाने फसवणुकीचा नवा फंडा
मोबाइल रिचार्ज किंवा केवायसी अपडेटच्या नावाखाली नागरिकांकडून बँकिंगशी संबंधित माहिती मिळवून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे अनोळखी व्यक्तीने फोन किंवा व्हॉट्सअॅपवरून सांगितलेल्या लिंक, वेबसाइट किंवा प्रक्रियेवर वैयक्तिक अथवा बँकिंग माहिती भरताना नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.










