ठाकरे गटाच्या त्या टीकेला मंत्री गुलाबराव पाटलांचे प्रत्युत्तर ; वाचा काय म्हणाले..

सप्टेंबर 18, 2026 10:45 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, पाणीटंचाई आणि शिवसेनेतील फुटीच्या मुद्द्यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या ‘तुमसे ना हो पाएगा’ या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. सरकार दुष्काळ आणि पाणीटंचाईच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

gulabrao patil adn uddhav thakre jpg webp

राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत पाणी आणि शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी परतीचा पाऊस चांगला पडावा, यासाठी गणपती बाप्पाला साकडे घातल्याचे सांगितले. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांकडून सरकारच्या कारभारावर करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी आंदोलनाच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते म्हणाले की, “आंदोलन करायलाही स्वभाव लागतो आणि आंदोलन करणारेच आता आमच्यासोबत आले आहेत, त्यामुळे आता आंदोलन करेल कोण?” असे म्हणत त्यांनी विरोधक पूर्णपणे असमर्थ आणि कमजोर असल्याचे म्हटले आहे. याशिवाय, मागील काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना संकट असो वा कोणतीही नैसर्गिक आपत्ती, प्रत्येक बिकट परिस्थितीत कसे उत्तम काम केले, याची आठवणही त्यांनी करून दिली.

मोदींच्या वाढदिवसाच्या जाहिरातीवरही भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींवर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेवरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीही गैर नाही, असे सांगत त्यांनी या जाहिरातींचे समर्थन केले.

‘आम्ही पक्षाचे विचार सोडले नाहीत’

दरम्यान, शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत सुरू असलेल्या सुनावणीवरही गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. “आम्ही पक्षाचे विचार सोडले नाहीत, उलट ते वाचवले,” असा दावा त्यांनी केला. शिवसेनेतील राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now