जळगावात DYSP नितीन गणापुरे यांच्या पथकाचा सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापा!

सप्टेंबर 17, 2026 9:13 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी जळगाव पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एकाच दिवशी शहरातील तीन सट्टा-जुगार अड्ड्यांवर छापे टाकत तिहेरी कारवाई केली. एमआयडीसी आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत चक्रावर (मशीनवर) सुरू असलेल्या हायटेक सट्टा अड्ड्यांवर केलेल्या या कारवाईत ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यापैकी दोघे मध्यप्रदेशातील इंदूर येथील आहेत.

ganapure

उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १६ सप्टेंबर रोजी विशेष पथकाने शहरातील विविध ठिकाणी छापे टाकले. पहिली कारवाई दुपारी साडेएक वाजता सिंधी कॉलनीतील खुपचंद साहित्य मार्केट येथे करण्यात आली. यावेळी आनंद सुनील माचरे (वय ३२, रा. संजय गांधी नगर, सिंधी कॉलनी रोड, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ३ हजार रुपये रोख, १५ हजार रुपये किमतीचा ५० इंची व्हिडिओकॉन कंपनीचा एलईडी टीव्ही, ५ हजार रुपयांचा एचपी कंपनीचा यूपीएस, कीबोर्ड व माऊस असा २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४३/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यानंतर दुपारी चार वाजता याच परिसरातील खुपचंद साहित्य मार्केट येथे दुसरी कारवाई करण्यात आली. राम सुरेश भाट (वय २९, रा. सिंधी कॉलनी, कंजरवाडा, जळगाव) याला ताब्यात घेत पोलिसांनी त्याच्याकडून २ हजार ५०० रुपये रोख, १० हजार रुपये किमतीचा ४३ इंची क्राऊन कंपनीचा एलईडी टीव्ही, ५ हजार रुपये किमतीचा फ्रॉनटेक कंपनीचा सीपीयू, कीबोर्ड व माऊस असा १७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७४४/२०२६, महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, तिसरी कारवाई सायंकाळी साडेसात वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भास्कर मार्केटमधील एका खोलीवर करण्यात आली. येथे पोलिसांनी कान्हा मोसम चौरसिया (वय २६, रा. मोतीचौक मकेरी मोहल्ला, इंदूर, मध्यप्रदेश) आणि जगदीश रमेशचंद्र गुजवार (वय ३९, रा. अरिहंत नगर, इंदूर, मध्यप्रदेश) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५ हजार ३०० रुपये रोख, ४३ व ३२ इंची क्राऊन कंपनीचे दोन एलईडी टीव्ही, फ्रॉनटेक कंपनीचा सीपीयू, कीबोर्ड व माऊस असा १८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण १० हजार ८०० रुपये रोख रकमेसह ५८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात चार एलईडी टीव्ही, कॉम्प्युटर सीपीयू, कीबोर्ड, माऊस, यूपीएस आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे अन्य साहित्याचा समावेश आहे. एकाच दिवशी झालेल्या या तिहेरी कारवाईमुळे शहरातील सट्टा-जुगार चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल सचिन सुरेश साळुंखे, पोलीस अंमलदार आवेश आरिफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रणय सुरेश पवार, अमोल ठाकूर, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गिरीश दिलीप पाटील, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस कॉन्स्टेबल समाधान रमेश पाटील आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनवणे यांच्या संयुक्त पथकाने केली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now