जळगाव लाईव्ह न्यूज । ज्या मान्सूनची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत होता, त्या मान्सूनने अखेर राज्यात हजेरी लावली असून खान्देशातही मंगळवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि अमळनेर तालुक्यात अर्धा ते एक तास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र, याच पावसादरम्यान अमळनेरमधून दुर्दैवी घटना समोर आलीय.

कपाशी लागवडीचे काम करत असताना अचानक अंगावर वीज कोसळल्याने तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राकेश रतिलाल पाटील (वय ३२, रा. शहापूर, ता. अमळनेर) असं मयत तरुणाचं नाव असून आईच्या डोळ्यादेखतच हा काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग घडल्याने, शहापूर परिसरासह संपूर्ण तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत राकेश पाटील हे कुटुंबाचे एकमेव कमावते माध्यम होते. सोमवारच्या हलक्या पावसानंतर कपाशी लागवडीसाठी पूरक वातावरण झाल्याने, मंगळवारी सकाळी राकेश हे आपल्या आई आणि काही महिला मजुरांसह शेतात कपाशी लागवडीसाठी गेले होते. दुपारपर्यंत काम अगदी सुरळीत सुरू होते. मात्र, दुपारच्या सुमारास अचानक हवामान बदलले, आकाशात काळे ढग दाटून आले आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला.
पाऊस वाढू लागल्याने शेतात उभी असलेली दुचाकी सुरक्षित ठिकाणी लावण्यासाठी राकेश रस्त्याच्या दिशेने धावले. मात्र, याच वेळी निसर्गाने घात केला. विजांच्या प्रचंड कडकडाटासह थेट राकेश यांच्या अंगावरच वीज कोसळली. हा विजेचा धक्का इतका तीव्र होता की, राकेश जागीच कोसळले. आपल्या पोटच्या गोळ्यावर वीज कोसळताना पाहून आईने केलेला आक्रोश ऐकून शेजारील शेतातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.
गंभीर जखमी झालेल्या राकेश यांना तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. आई आणि कुटुंबीयांचा हंबरडा पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
या प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, निसर्गाच्या या प्रकोपामुळे उध्वस्त झालेल्या पीडित शेतकरी कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी आर्त मागणी शहापूरच्या ग्रामस्थांनी केली आहे.











