जळगाव लाईव्ह न्यूज । उत्तर महाराष्ट्रातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या अमळनेर–गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा मार्गाच्या विकासाला अखेर गती मिळाली आहे. राज्य शासनाने या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी सुमारे १७२ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी दिली असून, त्यामुळे अमळनेर, धरणगाव, चोपडा, यावल तसेच धुळे जिल्ह्यातील लाखो नागरिकांना त्याचा थेट लाभ होईल.

दीर्घकाळापासून या मार्गाच्या दुरुस्ती आणि मजबुतीकरणाची मागणी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि शेतकरी वर्गाकडून केली जात होती. वाढती वाहतूक आणि रस्त्याची खराब झालेली अवस्था लक्षात घेता काँक्रिटीकरणाचा प्रस्ताव पुढे आला होता. अखेर शासनाने निधी मंजूर केल्याने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या रस्त्याच्या उन्नतीकरणासाठी अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले जात आहे. विविध विभागांशी समन्वय साधून आणि आवश्यक प्रस्तावांचा पाठपुरावा करून हा निधी मंजूर करण्यात आला.
धरणगाव ते चोपडा या मार्गावरील काम यापूर्वीच सुरू झाले असून आता धरणगाव फाटा ते अमळनेर हा टप्पाही विकसित होणार आहे. त्यामुळे धुळे, अमळनेर, धरणगाव, यावल आणि चोपडा या भागांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा आहे. विशेषतः धुळेमार्गे नाशिक आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना या रस्त्याचा मोठा फायदा होणार आहे.
सुमारे १७२ कोटी रुपये निधीतून होणाऱ्या अमळनेर–गडखांब–पातोंडा–धरणगाव फाटा रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे कृषी क्षेत्रालाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. केळी, कापूस, मका, भाजीपाला आणि इतर शेतमालाची वाहतूक जलदगतीने करता येणार असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. तसेच औद्योगिक मालवाहतूक, बांधकाम साहित्याची वाहतूक आणि व्यावसायिक व्यवहारांना चालना मिळणार आहे.







