‘मनरेगा’च्या बिलासाठी ७,५०० रुपयांची लाच घेताना चाळीसगावचा वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जून 25, 2026 11:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जून २०२६ । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) केलेल्या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी ७,५०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या सामाजिक वनीकरण विभागाच्या चाळीसगावच्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली आहे. यशोलाल विठ्ठल महाजन (वय ५३) असे लाचखोर वनपालाचे नाव असून या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

lach jpg webp

तक्रारदार यांच्या शेतात ‘मनरेगा’ अंतर्गत वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम मंजूर झाले होते. या कामासाठी शासनाकडून तीन वर्षांसाठी एकूण ४ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामांतर्गत झालेल्या खर्चाचे ५० हजार रुपयांचे देयक (बिल) मंजूर करून देण्यासाठी वनपाल यशोलाल महाजन याने बिलाच्या १५ टक्के म्हणजेच ७,५०० रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट ‘एसीबी’कडे (ACB) धाव घेत रीतसर तक्रार नोंदवली.

तक्रारदाराच्या अर्जावरून ‘एसीबी’च्या पथकाने पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चाळीसगाव येथे सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ७,५०० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने वनपाल महाजनला रंगेहात ताब्यात घेतले. याप्रकरणी आरोपी वनपाल यशोलाल महाजन यांच्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now