रावेर-मुक्ताईनगरात पावसाचा हाहाकार; पुराच्या विळख्यात प्रवाशांनी भरलेली बस अडकली

जून 25, 2026 12:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात बुधवारी मान्सूनने दमदार हजेरी लावत रावेर आणि मुक्ताईनगर तालुक्यांना अक्षरशः झोडपून काढले. काही तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. नाले-ओढे दुथडी भरून वाहू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

raverrain

मुक्ताईनगर तालुक्यातील कर्की गावाजवळ साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आलेली एक खाजगी बस अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात अडकली. नाल्यावरून वेगाने पाणी वाहत असताना बसचालकाने प्रसंगावधान राखत वाहन थांबवले. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये नाल्यांचे पाणी थेट वस्त्यांमध्ये शिरले. काही ठिकाणी घरांमध्ये आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये पाणी घुसल्याने संसारोपयोगी साहित्य, धान्य व मालाचे मोठे नुकसान झाले आहे. पहिल्याच जोरदार पावसात झालेल्या या नुकसानीमुळे नागरिक हवालदिल झाले असून प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुसळधार पावसामुळे काही भागांतील रस्तेही पाण्याखाली गेले होते. अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र दुसरीकडे या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. खरीप हंगामासाठी आवश्यक असलेला पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रावेर तालुक्याची पर्जन्यमान स्थिती
१. रावेर 173.00 मि.मी.
२. खानापुर 189
३. ऐनपुर 117
४. खिर्डी 35
५. निभोरा बु. 9
६. सावदा 15
७. खिरोदा प्र.या. 24

  1. पाल 25
  2. के-हाळा बु 203

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now