जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जून २०२६ । जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात घरगुती विहिरीतून मोटार बाहेर काढण्याच्या कामादरम्यान घडलेल्या अपघातात आजोबा, नातू आणि एक युवक विहिरीत कोसळल्याची घटना आज बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशवाडीतील एका घराच्या आवारात असलेल्या सुमारे ५० फूट खोल विहिरीतील इलेक्ट्रिक मोटार काढण्याचे काम सुरू होते. यावेळी रामलाल भावसार, त्यांचे नातू सिद्धेश भावसार आणि शेजारी देवेंद्र खाचणे हे तिघेही विहिरीजवळ होते. मोटार बाहेर काढताना विहिरीवरील सिमेंटचा आधार अचानक कोसळल्याने तिघांचाही तोल गेला आणि ते थेट विहिरीत पडले.

घटनेची माहिती मिळताच जळगाव महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने तातडीने मोहीम हाती घेत विहिरीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.या अपघातात रामलाल भावसार आणि सिद्धेश भावसार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर देवेंद्र खाचणे याला किरकोळ दुखापत झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच महापौर दीपमाला काळे यांनी घटनास्थळी भेट देऊन जखमींची विचारपूस केली. तसेच शहरातील बंदिस्त आणि धोकादायक अवस्थेतील विहिरींची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. या घटनेनंतर शहरातील जुन्या व असुरक्षित विहिरींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.







