चाळीसगावात पोलिसांच्या ‘कोम्बिंग ऑपरेशन’मध्ये महिलेच्या घरातून १८ तलवारींसह १० कोयते जप्त

जून 24, 2026 8:19 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चाळीसगाव शहर पोलिसांनी आज २४ जून रोजी पहाटे २ ते सकाळी ४ वाजेदरम्यान शहरात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई केली. या मोहिमेत ८० रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यात आली असून ४४ आरोपी घरी आढळून आल्याने त्यांना पोलिस स्टेशनमध्ये हजर राहण्याबाबत समज देण्यात आली. या कारवाईदरम्यान नववास नगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेच्या घरातून १८ तलवारी आणि १० कोयत्यांसारखी धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नागद रोड झोपडपट्टी परिसरातील एका व्यक्तीकडून अवैधरित्या तलवार बाळगल्याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला.

talavari

कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या तीन चारचाकी वाहनांवरही कारवाई करण्यात आली. मारुती सुझुकी व्हॅन, ऑडी आणि ह्युंदाई कंपनीच्या वाहनांसह सुमारे ३१ लाख रुपये किमतीची तीन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली असून मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

याशिवाय न्यायालयाकडून प्राप्त ८ फरार वॉरंटांची बजावणी करण्यात आली. दारूबंदी कायद्यांतर्गत ३ गुन्हे दाखल करून ६० लिटर गावठी हातभट्टी दारू व १ हजार लिटर कच्चे रसायन नष्ट करण्यात आले. तसेच न्यायालयाकडून प्राप्त ३ समन्सचीही बजावणी करण्यात आली.

ही मोहीम पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार वणकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये १ पोलिस निरीक्षक, २ सहाय्यक पोलिस निरीक्षक, ५ पोलिस उपनिरीक्षक, ६० पोलिस अंमलदार तसेच राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांचा सहभाग होता.

पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली असून शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अशा मोहिमा यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now