महाराष्ट्रात हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांसाठी नवीन नियम; ‘या’ नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई

जून 25, 2026 7:37 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्रातील हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांवर आता अन्न व औषध प्रशासनाची (FDA) कडक नजर असणार आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यात ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या अंतर्गत ग्राहकांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि धाबे मालकांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा कडक इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

hotel restorent new rule

हॉटेल व्यवसायिकांना कडक इशारा देतानाच मुंढे यांनी हॉटेल्सच्या किचनसाठी (स्वयंपाकघर) अत्यंत कडक आणि नवीन नियमावली जाहीर केली आहे. “आरोग्याविषयीच्या नियमांचे पालन करणे सर्वांना बंधनकारक असेल. जे नियमांचे पालन करतील त्यांनी घाबरण्याचे कारण नाही, मात्र उल्लंघन करणाऱ्यांना कोणीही वाचवू शकणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि धाब्यांसाठी नवीन नियम:
एफडीएच्या (FDA) नवीन नियमांनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, धाबे, मिठाईवाले, बेकऱ्या आणि अन्न प्रक्रिया केंद्रांचे किचन कसे असावे, याबद्दल खालील मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत:
स्वयंपाकघराच्या भिंती आणि फ्लोअरिंग हे वॉशेबल (धुता येण्याजोग्या) टाईल्सचे असावे, जेणेकरून तिथून पाणी झिरपणार नाही.
किचनमध्ये पुरेशी हवा खेळती असणे आवश्यक असून ‘एक्झॉस्ट फॅन’ बसवणे अनिवार्य आहे.
कच्च्या मालासाठी वेगळा सेक्शन आणि स्वयंपाक करण्यासाठी वेगळा सेक्शन असावा. तसेच कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र न ठेवता वेगवेगळे ठेवावे.
किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्न पूर्णपणे वेगवेगळे ठेवले पाहिजे.
किचनमध्ये पेस्ट कंट्रोल नियमित केले पाहिजे. अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळ, पाल, उंदरांचा प्रादुर्भाव नसावा. यासह ग्राहक हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांच्यासाठी पाणी, हँडवॉश, साबण, टॉवेल ठेवण्यात यावेत. किचनमध्ये नियमित पेस्ट कंट्रोल करणे आवश्यक आहे. अन्नाच्या ठिकाणी किडे, झुरळ, पाल किंवा उंदीर आढळल्यास थेट कारवाई होईल. तसेच इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवणे गरजेचे आहे.
ग्राहकांसाठी हॉटेलमध्ये शुद्ध पाणी, हँडवॉश, साबण आणि स्वच्छ टॉवेल ठेवणे बंधनकारक आहे.

…तर मोफत पाणी द्यावेच लागणार!
अनेक हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये ग्राहक आल्यावर थेट बाटलीबंद (मिनरल वॉटर) पाणी आणून ठेवले जाते आणि त्याचे पैसे आकारले जातात. या प्रवृत्तीला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी चाप लावला आहे. ग्राहकांना शुद्ध आणि सुरक्षित पिण्याचे पाणी मोफत उपलब्ध करून द्या, असे थेट आदेश त्यांनी सर्व हॉटेल चालकांना दिले आहेत.

“नियमांचे पालन करा, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. अस्वच्छता दिसल्यास कुणाचीही गय केली जाणार नाही.” असा इशारा अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now