जळगाव लाईव्ह न्यूज | राज्यात सध्या अर्थखात्याच्या वाटपावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. “राज्यात अर्थ खाते सांभाळता येण्यासारखा एकही सक्षम नेता नाही,” या शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. “राऊतांची टीका पूर्णपणे ‘अर्थहीन’ असून ज्यांनी मूळ शिवसेनेची आज ‘चिवसेना’ करून ठेवली आहे, त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नयेत,” अशा कडक शब्दांत अनिल पाटलांनी जळगावातून राऊतांना जोरदार घरचा आहेर दिला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री अनिल पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले, “संजय राऊत यांना मागच्या इतिहासाचा विसर पडलेला दिसतो. महाविकास आघाडीचे सरकार असताना आणि उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदावर असताना, ते या पदासाठी किती सक्षम आहेत, याबद्दल माध्यमांमध्ये सातत्याने कशी चर्चा रंगत होती, हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे स्वतःचा इतिहास आधी तपासावा.”

पुढे बोलताना अनिल पाटील यांनी स्पष्ट केले की, राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थ खाते कोणाला द्यावे किंवा कोणाकडे सोपवू नये, हा पूर्णपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार आहे. निर्णय घेण्याची ती क्षमता मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर आणि महायुतीच्या अंतर्गत बाबींवर बोलण्याचा संजय राऊत यांना कोणताही नैतिक अधिकार नाही.
संजय राऊत रोज सकाळी उठून महायुती सरकारवर जी फुकटची चिखलफेक करत असतात, त्याला आता जनताही कंटाळली आहे. राऊत यांनी सरकारला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा स्वतःचा उरलेला पक्ष कसा सांभाळायचा आणि पक्ष आणखी किती फुटण्यापासून कसा वाचवायचा, याकडे आधी लक्ष द्यावे, असा टोलाही अनिल पाटील यांनी शेवटी लगावला. अनिल पाटलांच्या या थेट विधानामुळे जळगावसह राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत.







