खळबळजनक ! अमळनेर रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या सहाय्यक फौजदाराने स्वतःवर झाडली गोळी

जून 16, 2026 11:14 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । अमळनेर रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे सुरक्षा दलातील (आरपीएफ) सहाय्यक फौजदाराने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. एएसआय जयपाल सिंग असे जखमी कर्मचार्‍याचे नाव असून त्याची मृत्यूशी झुंज सुरू असून या घटनेमुळे रेल्वे प्रशासनासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

jaipal singh

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमळनेर रेल्वेस्थानकातील आरपीएफ कार्यालयात ड्युटीदरम्यान सहाय्यक फौजदार जयपाल सिंह यांनी स्वतःच्या सेवाशस्त्रातून डोक्यात गोळी झाडून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. गोळीबाराचा आवाज ऐकून सहकारी कर्मचारी घटनास्थळी धावले. त्यानंतर जखमी अवस्थेतील फौजदाराला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांची प्रकृती गंभीर असल्याने प्राथमिक उपचारांनंतर पुढील वैद्यकीय उपचारासाठी त्यांना धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आत्महत्येच्या प्रयत्नामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक कारण, मानसिक तणाव अथवा इतर कोणते कारण या घटनेमागे आहे का, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि आरपीएफचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनेबाबत अधिक तपास सुरू असून चौकशीअंतीच संपूर्ण सत्य समोर येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now