⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

पोलीस निरीक्षक बूट घालून चढले नारदांच्या गादीवर; वारकरी संप्रदाय संतप्त

कार्यक्रम केला बंद, राज्यव्यापी आंदोलनचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२२ । चाळीसगाव शहरातील हनुमानसिंग राजपूत परिसरात सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळी माईक व स्पीकर लावून कीर्तन सुरू होते. शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी हे कीर्तन बंद पाडले. शिवाय ते बूट घालून नारदाच्या गादीवर चढले. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले. यामुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत असून वारकरी संप्रदायाने राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

अधिक माहिती अशी की, चाळीसगावातील सप्तश्रृंगी मंदिराजवळ रात्रीच्या वेळेला माइक व स्पीकर लाऊन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी शहर पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी सुरू असलेले कीर्तन बंद केले. वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा विषय असेलल्या नारदांच्या गादीवर ते बूट घालून वर चढले. तसेच वारकरी संप्रदायाला खडेबोल सुनावले, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. पोलीस निरीक्षकांचा तसा एक फोटोही व्हायरल झाला आहे. रात्री दहा वाजून गेले होते. त्यानंतरही कीर्तन सुरू होते. मात्र, पोलीस निरीक्षकांची वागणुकीची पद्धत अतिशय चुकीची होती, असा आरोप वारकरी संप्रदायातील मंडळींनी केली आहे.

तसेच पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्या वागणुकीमुळे वारकरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी तात्काळ माफी मागावी. अन्यथा आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडू असा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी चाळीसागवामधूनही नाराजीचा सूर उमटत आहे. पोलीस निरीक्षकांनी कीर्तनात चक्क बूट घालून प्रवेश केल्याबद्दल निषेध व्यक्त होत आहे. वारकरी संप्रदाय अतिशय उदार मानला जातो. इतरांसारखे ते कट्टर नसतात. त्यांच्यामुळे कधी गावात दंगली घडल्याचे ज्ञात नाही. तरीही त्यांच्यासोबत अशी वर्तवणूक केल्याबद्दल गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप आहे. पोलिसांनी आपले वर्तन सुधारावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.