जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जुलै २०२६ । निम्म्या जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या गिरणा धरणाला नाशिक जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात पाण्याची प्रचंड आवक होत असून, अवघ्या चार दिवसांत धरणाचा जलसाठा ४० टक्क्यांवरून थेट ७० टक्क्यांवर पोहोचला आहे.

२५ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार गिरणा धरणात ७०.९४ टक्के इतका पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील नागरिक व शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

पाचोरा, भडगाव, चाळीसगावला मोठा दिलासा
गिरणा धरणावर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगावसह अनेक तालुक्यांची शेती आणि पिण्याच्या पाण्याची भिस्त अवलंबून आहे. त्यामुळे धरणातील जलसाठ्यातील ही जलद वाढ संपूर्ण जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक मानली जात आहे.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला पावसाने काहीशी ओढ दिल्याने धरणातील साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे गिरणेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या चार ते पाच दिवसांत धरणाच्या साठ्यात तब्बल ३० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली. २२ जुलै रोजी ४०.३८ टक्के असलेला हा साठा २५ जुलै रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत ७० टक्क्यांवर पोहोचला.
..तर जुलैअखेर धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता
वरच्या भागात पाऊस असाच सुरू राहिल्यास आणि पाण्याची आवक कायम राहिल्यास जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत गिरणा धरण १०० टक्के भरून ओव्हरफ्लो होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या जलद वाढीमुळे आगामी खरीप हंगामासह सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.









