जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहर आणि जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून हलक्या ते मध्यम पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. दरम्यान जिल्ह्यासाठी पुढील चार ते पाच दिवस हवामानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, २६ ते ३० जुलै या कालावधीत जिल्ह्यात मान्सून पुन्हा पूर्ण क्षमतेने सक्रिय होणार आहे.

या काळात जिल्ह्याच्या बहुतांश भागांत मध्यम ते जोरदार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसासोबतच काही भागांत ढगांच्या गडगडाटासह विजांचा तीव्र कडकडाट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा
हवामानातील या बदलांमुळे आणि विजांच्या तीव्र कडकडाटाच्या शक्यतेमुळे प्रशासनाकडून नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विजा चमकत असताना नागरिकांनी मोकळ्या मैदानात, झाडांखाली किंवा पाण्याचे साठे असलेल्या ठिकाणी थांबणे टाळावे, तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि गुराख्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.









