भडगाव हादरले ! दारूच्या पैशांवरून पत्नीची निर्घृण हत्या, आरोपी पती अटकेत

जुलै 26, 2026 8:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे खुनाच्या घटनेने परिसर हादरला. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास पत्नीने नकार दिल्याच्या रागातून पतीने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची निर्घृण हत्या केली. ललिता आत्माराम राठोड (वय 36) असं खून झालेल्या महिलेचं नाव असून या प्रकरणी भडगाव पोलिसांनी आरोपी पती आत्माराम पतीलाल राठोड (वय 40) याला तातडीने ताब्यात घेतले आहे.

Chopper murder

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतवाडी तांडा येथे आज रविवारी (दि. 26) सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास आत्माराम राठोड याने पत्नी ललिता राठोड हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. मात्र पत्नीने पैसे देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या आत्मारामने घरातील चाकू उचलून ललिता यांच्या पोटावर सपासप वार केले.

या हल्ल्यात ललिता राठोड गंभीर जखमी झाल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी आत्माराम राठोड याला ताब्यात घेतले असून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. तसेच गुन्ह्याचे पुरावे संकलित करण्यासाठी फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, भडगाव येथे पाठविण्यात आला. या प्रकरणी मयत महिलेचे भाऊ प्रकाश मेहराम चव्हाण (रा. दळवेल, ता. पारोळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 240/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कारंकार करीत असून, घटनेनंतर वसंतवाडी तांडा परिसरात शांतता असून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कौटुंबिक वादातून घडलेल्या या हत्येने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now