जळगाव लाईव्ह न्यूज । पाचोऱ्याकडून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका खाजगी ट्रॅव्हल्सला चाळीसगावजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स थेट रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गायरान फाट्याजवळ झाला. पाचोऱ्याहून गुजरातकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या या ट्रॅव्हल्सचा वेग अचानक चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झाला आणि गाडी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघात झाला तेव्हा ट्रॅव्हल्समध्ये एकूण २२ प्रवासी प्रवास करत होते. अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, परिसरातील स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. तरुणांनी तात्काळ अपघातग्रस्त गाडीच्या दिशेने धाव घेत जखमींना बाहेर काढले. या अपघातात ६ प्रवासी जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मोठा अनर्थ टळला
स्थानिक नागरिक आणि तरुणांच्या मदतीने ट्रॅव्हल्समधील सर्व २२ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. सुदैवाने या अपघातात कोणाचाही जीव गेला नसल्याने प्रशासनाने आणि नातेवाईकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाई सुरू आहे.









