चाळीसगाव पोलिसांची अवैध गुटखा तस्करांवर मोठी कारवाई; लाखोंच्या मुद्देमालासह ५ जण गजाआड!

जुलै 10, 2026 2:48 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जुलै २०२६ । चाळीसगाव शहर पोलिसांनी अवैध गुटखा तस्करांविरोधात मोठी धडक कारवाई करत मध्य प्रदेशातून आणलेला लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून, प्रतिबंधित गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेल्या कारसह तब्बल ६ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

chsgutkha

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ हे गोपनीय माहिती संकलित करत होते. ८ जुलै २०२६ रोजी त्यांना एका गोपनीय बातमीदारामार्फत पक्की माहिती मिळाली की, शहरातील हनुमानवाडी परिसर, बलभीम व्यायामशाळेजवळ, आनंदवाडीतील जुन्या डिझेल गॅरेजसमोर आणि बसस्थानकाच्या मागील लक्ष्मीनगर परिसरात काही व्यक्ती शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतूक व विक्री करत आहेत.

या माहितीच्या आधारे विशेष पथकाने सापळा रचून कारवाई केली. पोलिसांनी अजित चांदूमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र केसरवाणी आणि सौरभ संजय शिंगणे (सर्व रा. चाळीसगाव) यांना ताब्यात घेतले. आरोपींकडील ट्रॅव्हल बॅगची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, तंबाखू तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली टाटा इंडिका (एमएच-१८-डब्ल्यू-७८३७) कार असा एकूण ६,५७,०७८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून तस्करी करून चाळीसगावात आणण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत. पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ, पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, पोलीस कॉन्स्टेबल मोहन सूर्यवंशी, अशोक मोरे आणि कल्पेश पगारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now