⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

..म्हणून महाराष्ट्र, बंगालमध्ये छापेमारी : खा.शरद पवारांनी सांगितले गुपीत

देवेंद्र फडणवीसांच्या ट्विटचा मी आनंद घेतो, सामाजिक सलोखा राखणे आवश्यक

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२२ । देशात सध्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यात केंद्राच्या एजन्सीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांना काहीही करून हि राज्ये हातात हवी होती, परंतु त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि जनतेने त्यांना साथ दिली नाही त्यामुळे त्यांचा अपेक्षा भंग झाला. ते लोक याठिकाणी हस्तक्षेप कसा करता येईल, कसे ताब्यात घेता येईल याचा विचार करून कामाला लागले आहेत. त्यामुळेच हि छापेमारी सुरु असल्याचे खा.शरद पवार यांनी सांगितले.

लोकसंघर्ष मोर्चातर्फे आयोजित महिला संकल्प परिषदेच्या निमित्ताने खा.शरद पवार जळगावात आले असून गुरुवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. खा.पवार म्हणाले कि, राज ठाकरे यांची भूमिका हिंदुत्वाकडे दिसते आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपली दिशा, ध्येय ठरवत असतो. आजपर्यंत मनसे आपली जागा निर्माण करू शकले नाही परंतु राज्यातील सामाजिक ऐक्य धोक्यात येऊ नये अशी भीती मला वाटते, असे पवार म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी जातीवाद माझ्यावर कसा टाकला हे मलाच कळत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून पक्षाने सर्व समाजाला सोबत घेऊन न्याय दिला. फडणवीसांकडे दुसरा काही मुद्दा नाही म्हणून ते असे वक्तव्य करत असतात.

खा.पवार म्हणाले, आज संपूर्ण भारतात वीज टंचाई आहे. दुर्दैवाने हा राष्ट्रीय प्रश्न झाला आहे. कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने वीज तुटवडा आहे. महाराष्ट्रातील सर्व नेते या प्रश्नावर गांभीर्याने विचार करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी काही अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली असून दोन-तीन दिवसात ते प्रभावी पर्याय कळवतील, असे त्यांनी सांगितले. काही दिवसापूर्वी आणखी ४ मंत्री जेलमध्ये जाणार असे वक्तव्य माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांनी केले होते, त्यावर बोलताना खा.पवार म्हणाले, केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरु आहे. गिरीश महाजन गृहमंत्री नाही, त्यांच्या हातात काही सत्ता नाही. अलीकडे एक नवीन पद्धत सुरु झाली आहे. जे प्रत्यक्ष सत्तेत नाही, त्यांनी काहीतरी भूमिका घ्यायची आणि त्यानुसार निर्णय घ्यायचा असे काही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

खा.पवार पुढे म्हणाले, बाबासाहेब पुरंदरेंनी जेम्स लेनचे कौतुक केले होते. जेम्स लेनच्या पुस्तकात शिवरायांबद्दल आक्षेपार्ह उल्लेख केलेला होता. पुरंदरेंनी शिवजयंतीच्या तारखेवरून माफी मागितली होती. त्याच्यावर अधिक बोलून वाद वाढवू नये, असे पवार म्हणाले. भविष्य मनसे, भाजप युती होईल का हे सांगता येणार नाही. पुढील ५ वर्ष देखील महाविकास आघाडीच राहावी असा आमचा मानस आहे. नागरिकांनी चांगले सरकार आणि सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल असे खा.पवार यांनी सांगितले.