इलेक्ट्रिक फिटिंग करताना विजेचा धक्का; जळगावात १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जुलै 4, 2026 3:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. जोशीपेठ परिसरात एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत असताना, विजेचा जोरदार धक्का लागून १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मुस्तकीम आसिफ भैय्या पटेल (वय १९, रा. मासूमवाडी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

mustakim patel

मिळालेल्या माहितीनुसार, जोशीपेठेतील एका मंदिरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात सुरू होते. मुस्तकीम आपल्या सहकाऱ्यांसह वायरिंगचे काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. या धक्क्यामुळे तो खाली कोसळून गंभीर जखमी झाला.

घटना लक्षात येताच सहकाऱ्यांनी तातडीने त्याला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

मुस्तकीमच्या निधनाची बातमी समजताच त्याचे नातेवाईक, मित्र आणि परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.

माहितीनुसार, मुस्तकीम गेल्या सुमारे २० दिवसांपासून एका ठेकेदाराकडे इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत होता. त्याचे वडील मसाले विक्रीचा व्यवसाय करतात. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे.

दरम्यान, या दुर्घटनेबाबत संबंधित पोलीस ठाण्यात वृत्त लिहिपर्यंत कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती. या घटनेमुळे मासूमवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now