जळगाव लाईव्ह न्यूज । महाराष्ट्र विधिमंडळाच्या चालू पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी जळगाव शहराशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न सभागृहात औचित्याच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केले. जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांचा प्रश्न, फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि मनपातील रिक्त पदांची भरती या विषयांवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधले.

सभागृहात बोलताना आमदार भोळे यांनी जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील २,३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न २०१२ पासून प्रलंबित असल्याचे सांगितले. रेडीरेकनर दर निश्चितीमुळे हा प्रश्न रखडल्याने हजारो व्यापाऱ्यांवर त्याचा परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी मनपाला आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचे निर्देश दिले होते, मात्र अद्याप प्रस्ताव पाठविण्यात आलेला नसल्याची बाबही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली.

यासोबतच शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक आणि लघु व्यावसायिकांसाठी फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण, नोंदणी आणि स्वतंत्र व्हेंडिंग झोन विकसित करण्याची मागणी त्यांनी केली. अतिक्रमण हटाव कारवाईमुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याने त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, जळगाव महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणावरील रिक्त पदांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे सांगत, या पदांचा आढावा घेऊन नोकरभरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली.
जळगाव शहरातील व्यापारी, फेरीवाले, हातगाडीधारक, मनपा कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आमदार सुरेश भोळे यांनी यावेळी दिली.











