जळगाव लाईव्ह न्यूज | ३ जुलै २०२६ । अकोला येथे लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले मुद्रांक जिल्हाधिकारी किरण चौधरी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. नाशिक आणि जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) संयुक्त पथकाने गुरुवारी जळगावातील त्यांच्या सीलबंद घराची ‘इन कॅमेरा’ झाडाझडती घेतली. या कारवाईत एसीबीच्या हाती मोठे घबाड लागले असून दीड कोटी रुपयांहून अधिकची रोकडसह एकूण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?
एसीबीने २६ जून रोजी अकोला येथे किरण चौधरी यांना १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. त्यानंतर सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान चौधरी यांच्या जळगावातील विष्णुनगर येथील साईप्रभा आर्केड मधील घर बंद असल्याने एसीबीने ते पंचांसमक्ष सीलबंद केले होते. मात्र, २८ जून रोजी पहाटे काही नातेवाईकांनी मागील दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. एसीबीचे अधिकारी आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने कारवाई करून संबंधितांना ताब्यात घेतले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला.

असा मुद्देमाल जप्त केला?
दरम्यान, काल २ जुलै रोजी किरण चौधरी यांच्या पत्नी मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत नाशिक आणि जळगावच्या एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून पुन्हा घरझडती घेण्यात आली. यावेळी घरातून १ कोटी ५३ लाख ८४ हजार ६३० रुपयांची रोख रक्कम, ६० लाख ५७ हजार १३५ रुपये किमतीचे ४२२.१०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ६२ लाख १३ हजार ३७६ रुपये किमतीच्या विविध मालमत्तांची कागदपत्रे, ३१ हजार ४१६ रुपये किमतीचे चांदीचे दागिने, ११ लाख ५२ हजार ७४५ रुपयांच्या सोने खरेदीच्या पावत्या आणि ६ लाख २५ हजार ५४५ रुपये किमतीच्या विविध घरगुती वस्तू जप्त करण्यात आल्या. एकूण २ कोटी ९४ लाख ६४ हजार ८४७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर महसूल व मुद्रांक विभागात मोठी खळबळ उडाली असून, किरण चौधरी यांच्या बेहिशेबी संपत्तीचा तपासही एसीबीकडून सुरू आहे. त्यांच्या आर्थिक व्यवहारांची, मालमत्तेची आणि संबंधित कागदपत्रांची सखोल चौकशी करण्यात येत आहे.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.








