⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

आ.चंद्रकांत पाटलांकडून श्रेयावादाचा केविलवाणा प्रयत्न : ऍड.रोहिणी खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । ०५ मे २०२१ । मुक्ताईनगर शहरातील जुने गावातील नागेश्वर मंदिराकडून जुने कोथळी येथील श्रीक्षेत्र मुक्ताबाई मंदिरात जाताना रस्त्यात असलेल्या पुलाचे भूमिपूजन मंगळवारी (ता. ४) आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी टीका केलीय.  या पुलाचे श्रेय आमदार चंद्रकांत पाटील  यांनी घेऊ नये. हा पूल माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी मंजूर करून त्यावर निधी आणला असल्याने आमदारांनी श्रेयवादाचा केविलवाणा प्रयत्न करू नये, अशी टीका रोहिणी खडसे – खेवलकर  यांनी पत्रकार परिषदेत केली.

चांगदेव मंदिर मानेगाव, जुनी कोथळी गजानन महाराज मंदिर मुक्ताईनगर ते राज्य महामार्ग सहा रस्ता प्रजिमा ९१ मध्ये निंबा देवी मंदिराजवळ मोठ्या पुलाची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात माजी मंत्री एकनाथ खडसे हे आमदार असतानाच तत्कालिन महसूल, कृषी, मदत, पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या पुलाची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात मागणी केली होती. या पुलासाठी १५० लाख रुपये मंजूर देखील करण्यात आले आहे.

मात्र, पुलासाठी निधी आल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करून श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवलेला आहे.आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः केलेल्या कामाचेच श्रेय घ्यावे. इतरांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रकार त्यांनी करू नये, असा आरोप करत श्रेयच घ्यायचे असेल तर आमदारांनी मेळसांगवे- पंचाने- सुलवाडी- ऐनपूर – रावेर हा तापी नदीवरील पूल करून दाखवावा, असे जाहीर आव्हान त्यांनी दिले. जर हा पूल केला तर त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू, असे रोहिणी खडसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.