पगार मागितल्याचा राग; हॉटेल मालकाच्या मारहाणीत वॉचमनचा मृत्यू, मुक्ताईनगरात खळबळ

ऑगस्ट 4, 2026 1:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा शिवारात पगाराचे थकीत पैसे मागितल्याच्या कारणावरून हॉटेल मालकाने वॉचमनला बेदम मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोकुळ तारासिंग जाधव (वय ५०, रा. निंभोरा) असं मृत वॉचमनचे नाव असून या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

jalgaon mahanagar palika 11 jpg webp

निंभोरा येथील रहिवाशी गोकुळ जाधव (वय ५०, रा. निंभोरा) हे उचंदा शिवारातील ‘शेर-ए-पंजाब’ ढाब्यावर गेल्या पाच महिन्यांपासून वॉचमन म्हणून काम करत होते. त्यांच्या पत्नी सुमित्राबाई जाधव या देखील त्याच ढाब्यावर पोळ्या बनविण्याचे काम करत होत्या. मात्र, ढाबा मालक कमलजीत सिंग प्रीतमसिंग याने गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून दोघांचाही पगार थकवून ठेवला होता.

फिर्यादीनुसार, १ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे १ वाजता गोकुळ जाधव यांनी मालकाकडे थकीत पगाराची मागणी केली. याचा राग आल्याने आरोपीने त्यांना रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गॅरेजजवळ नेले आणि लाकडी काठीने त्यांच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात गोकुळ जाधव गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि ते घटनास्थळीच बेशुद्ध पडले.

घटनेची माहिती मिळताच पत्नी सुमित्राबाई यांनी जखमी पतीला तातडीने उपचारासाठी भुसावळ येथे नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना बऱ्हाणपूर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, २ ऑगस्ट रोजी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या पत्नी सुमित्राबाई जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात आरोपी कमलजीत सिंग प्रीतमसिंग याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now