मुक्ताईनगर पोलिसांची मोठी कारवाई; आंतरराज्य दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, २५ लाखांच्या ३० मोटारसायकली जप्त

जून 28, 2026 10:38 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, मुक्ताईनगर पोलिसांनी आंतरराज्य पातळीवर दुचाकींची चोरी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दोन मुख्य संशयितांसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून तब्बल २५ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ३० मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईमुळे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील अनेक वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

duchaki

मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी विशाल सुरेश सोनवणे (रा. पिंपरुड, ता. यावल), कुंदन सुनिल महाले (रा. सालबर्डी, ता. मुक्ताईनगर) तसेच दोन अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान संशयितांनी संबंधित गुन्ह्यातील मोटारसायकलसह आणखी २९ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. चोरीनंतर या दुचाकी विविध रेल्वे स्थानके आणि बसस्थानकांवरील ‘पे अँड पार्क’मध्ये उभ्या करून तेथूनच ग्राहकांना विक्री करण्याची त्यांची पद्धत असल्याचे तपासात उघड झाले.

जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकली महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये नोंदणीकृत असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील चोरीच्या दुचाकींबाबत गुजरातमधील उधना (सुरत) तसेच कल्याण, नेरुळ, निफाड, वणी, इगतपुरी, गंगापूर, ओझर, सरकारवाडा, नेरळ, पारोळा, जिल्हापेठ आणि एरंडोल पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली. या कारवाईत पोहेकॉ. अजय खंडेराव, महेंद्र सुरवाडे, पो.ना. असिम तडवी, कल्पेश आमोदकर तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now