कुंभमेळा बनावट वर्कऑर्डर प्रकरणात जामनेरातून आणखी ३ जणांना अटक

ऑगस्ट 15, 2026 12:16 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यातील कामांच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात नाशिक पोलिसांनी आणखी तीन जणांना जामनेरातून बेड्या ठोकल्या आहे. अब्दुल रईस अब्दुल मुनाफ शेख, शकील अहमद सलीमुद्दीन शेख (४३) आणि मोहम्मद वसीम अब्दुल गफार (४२) असं अटक केलेल्या तिघांचे नाव असून या कारवाईनंतर प्रकरणातील अटक केलेल्या संशयितांची संख्या आता सहा झाली आहे.

fakeorder

या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच सरकारी यंत्रणेतील कोणाचा छुपा हात आहे का, याचा तपासही नाशिक पोलिसांकडून सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जामनेरच्या झेरॉक्स चालकासह नगरसेवकाची चौकशी

तीन संशयितांच्या अटकेनंतर पोलिसांनी शुक्रवारी जामनेर येथील एका झेरॉक्स चालकासह ठेकेदार असलेल्या नगरसेवकाला चौकशीसाठी नाशिकला बोलावले आहे. या दोघांकडून प्रकरणाशी संबंधित माहिती घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी आरोपी शकील शेख याने ज्यांना पैसे दिल्याचा संशय आहे, अशा तीन जणांना नाशिक रोड क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. आता या दोघांच्या चौकशीतून कोणती माहिती समोर येते आणि त्यानंतर पोलीस कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.

चुकीच्या स्पेलिंगमुळे बनावट वर्कऑर्डरचा भांडाफोड

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, कुंभमेळ्यातील कामांच्या बनावट वर्कऑर्डरचा हा प्रकार एका इंग्रजी नावाच्या चुकीच्या स्पेलिंगमुळे उघडकीस आला. छत्रपती संभाजीनगर येथील एका केटररला कुंभमेळ्यातील तब्बल २७८ कोटी रुपयांची तीन टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते.

यासाठी आरोपींनी संबंधित व्यक्तीकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. मात्र, प्रत्यक्षात काम न झाल्याने तक्रारदाराने पाठपुरावा सुरू केला. त्यावेळी त्याला बनावट वर्कऑर्डर देण्यात आली. पुढे तक्रारदाराने करारनामा मागितल्यानंतर संशयितांकडून टाळाटाळ सुरू झाली. दरम्यान, वर्कऑर्डरवरील एका नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक असल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. यानंतर त्याला संपूर्ण प्रकरणाबाबत संशय आला आणि तपासातून बनावट वर्कऑर्डरचा प्रकार समोर आला. पोलिसांकडून आता अटक केलेल्या संशयितांची चौकशी करून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now