जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला गुटखा, एक मारुती सुझुकी अर्टिगा कार आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाणे व विशेष पथकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध गुटखा, मादक पदार्थ आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे.

दरम्यान, १७ जुलै रोजी गोपनीय माहितीदारामार्फत मारुती सुझुकी अर्टिगा (एमएच-३० एझेड-४६६४) या वाहनातून मुक्ताईनगरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी केल्यानंतर एलसीबीच्या पथकाने मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला. काही वेळातच संशयित वाहन तेथे येताच पोलिसांनी ते अडवून झडती घेतली.
झडतीदरम्यान वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत ३ लाख ८६ हजार ९०८ रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, ८ लाख रुपयांची मारुती सुझुकी अर्टिगा कार आणि २० हजार रुपये किमतीचे विवो कंपनीचे दोन मोबाईल फोन असा एकूण १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी सय्यद आरिफ सय्यद हकीम उर्फ नदीम (वय ३५, रा. पिंपळगाव राजा, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि खलील उल्ला खान (वय ३२, रा. शेगाव रोड, खामगाव, जि. बुलढाणा) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, गुटखा पुरवठ्याचे जाळे, त्यामागील मुख्य सूत्रधार आणि इतर संबंधितांचा शोध पोलीस घेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नंदराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलीस उप निरीक्षक/संतोष पवार, पोना/हेमंत पाटील, पोकॉ/रतन गिते नेमणुक – स्थानिक गुन्हे शाखा यांचे पथकाने उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली आहे.











