जळगाव लाईव्ह न्यूज । स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने प्रवाशांना मोठी भेट दिली आहे. देशातील विविध शहरांदरम्यान प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी रेल्वे बोर्डाने सात नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांना मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे, यापैकी दोन गाड्या भुसावळमार्गे मुंबईकडे धावणार आहेत. त्यामुळे जळगाव, भुसावळ आणि परिसरातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

या नव्या सेवांमध्ये प्रयागराज–लोकमान्य टिळक टर्मिनस आणि सुभेदारगंज–लोकमान्य टिळक टर्मिनस या दोन गाड्यांचा समावेश आहे. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणाऱ्या या सेवांमुळे भुसावळ रेल्वे मार्गाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.

प्रयागराज ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या अमृत भारत एक्सप्रेसला साप्ताहिक सेवेची मंजुरी देण्यात आली आहे. ही गाडी सतना, जबलपूर, इटारसी, भुसावळ आणि कल्याण या प्रमुख स्थानकांवरून धावणार आहे. या मार्गामुळे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांना भुसावळमार्गे थेट प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. खान्देशातील प्रवाशांनाही या सेवेचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
सुभेदारगंज-मुंबई ट्रेनचे आता अमृत भारतमध्ये रूपांतर
रेल्वे बोर्डाने सुभेदारगंज ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणाऱ्या विशेष रेल्वेचे ‘अमृत भारत एक्सप्रेस’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक १४१२१ आणि १४१२२ या क्रमांकाने ही सेवा धावणार आहे. ही सेवा सुभेदारगंजहून आठवड्यातून दोन दिवस, तर मुंबईहूनही आठवड्यातून दोन दिवस उपलब्ध राहणार आहे.
सुभेदारगंजहून ही गाडी फतेहपूर, गोविंदपुरी, बांदा, चित्रकूट धाम, सतना, मैहर, कटनी, जबलपूर, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, खांडवा, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण आणि ठाणे मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनसपर्यंत पोहोचणार आहे.
स्वस्त दरात लांब पल्ल्याचा प्रवास
अमृत भारत एक्सप्रेस ही सेवा सर्वसामान्य प्रवाशांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे. या गाड्यांमध्ये नॉन-एसी डबे असतील आणि प्रीमियम रेल्वे सेवांच्या तुलनेत प्रवासाचे भाडे तुलनेने कमी ठेवण्याचा उद्देश आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील अनेक शहरांदरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.
भुसावळ रेल्वे स्थानकाचे महत्त्व वाढणार
भुसावळ हे मध्य रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाचे जंक्शन असल्याने या मार्गावरून नव्या अमृत भारत एक्सप्रेस सुरू होणे खान्देशासाठी विशेष महत्त्वाचे आहे. मुंबई, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांना अधिक पर्याय मिळणार असून, आगामी काळात प्रवासी वाहतुकीला यामुळे चालना मिळण्याची अपेक्षा आहे.







