⁠ 
मंगळवार, एप्रिल 23, 2024

जळगावातील काही भागात बरसल्या पावसाच्या सरी, अवकाळी पावसाबाबत आजचा दिवस कसा असेल?

जळगाव लाईव्ह न्युज | १४ मार्च २०२३ | राज्यावर पुन्हा अवकाळीचे ढग गडद झाले असून हवामान खात्याने पुढचे चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तविली असून आज मंगळवारी सकाळी जळगाव परिसरात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली.

हवामान विभागाकडून (IMD) आजपासून (14 मार्च) राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात गारपिटीसह पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात 15 आणि 16 मार्चला अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भात 16 आणि 17 मार्चला काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्याला देखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळपासून जिल्ह्यावर अवकाळीचा ढग दाटून आले आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांचा कडकडाटसह पावसाच्या सरी बसरल्या. सध्या जिल्ह्यात गहू, हरभरा,ज्वारी पीक कापणीला आले आहेत. त्यातच अवकाळी पावसाचे संकट आले. त्यामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून जळगाव जिल्ह्याला 15 आणि 16 या तारखेला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी