जळगावकरांसाठी आजचा दिवस महत्वाचा ; सकाळपासून जोरदार पाऊस, वाचा हवामान अंदाज?

जुलै 8, 2026 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जुलै २०२६ । गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाने अधूनमधून हजेरी लावली असली तरी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम होती. मात्र, आज बुधवारी सकाळपासून जिल्ह्यात अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

RN8july

हवामान विभागाने यापूर्वीही अनेकदा मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यापैकी काहीच अंदाज प्रत्यक्षात खरे ठरले. दरम्यान, आज (८ जुलै) सकाळपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. पुढील काही तास जळगावकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याकडून जिल्ह्यातील चोपडा, धरणगाव, एरंडोल, पाचोरा आणि जळगाव तालुक्यासह काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पावसासाठी हवेची दिशा महत्त्वाची ठरणार असून, वाऱ्यांचा प्रवाह बदलल्यास पावसाचा पट्टा छत्रपती संभाजीनगरकडे सरकण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे हवामान अभ्यासकांनी पावसाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, ९ जुलैनंतर जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता आहे. एल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सूनचे आगमन आधीच उशिरा झाले होते. आता त्याच एल निनोचा दुसरा परिणामही जाणवण्याची शक्यता असून, राज्यातील अनेक भागांत पावसाचा वेग मंदावू शकतो.

सध्या कोकण, पुणे आणि नाशिक विभागात समाधानकारक पाऊस होत असला तरी खान्देशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पावसाची तूट कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ६५ टक्के क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित पेरण्यांसह पिकांच्या वाढीसाठी दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची नितांत गरज आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतील पावसाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now