विश्रांतीनंतर जळगावात पुन्हा पाऊस बरसणार; जिल्ह्यात आजपासून ८ दिवस पावसाची शक्यता

जून 27, 2026 11:06 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२६ । जळगाव जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअस खाली आला असून, जळगावकरांना उष्णतेच्या तीव्र उकाड्यातून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने जळगावकरांसाठी दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. आज, २७ जूनच्या दुपारपासून ते पुढील ८ दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

rain27june

कमी दाबाचा पट्टा ठरतोय पूरक!

बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे मान्सूनला मोठी गती आणि शक्ती मिळण्याचे संकेत आहेत. परिणामी, जळगाव शहर आणि जिल्हाभरात पावसाचा जोर वाढणार असून मान्सून अधिक सक्रिय होणार आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे २७ जूनच्या दुपारपासून ४ जुलैपर्यंत जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मान्सून अधिक सक्रिय होईल आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर जिल्ह्यात अधूनमधून ते मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.

मात्र, सध्या एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये एकाच वेळी किंवा समान प्रमाणात पाऊस पडेलच असे नाही. तरीही बहुतांश भागांत कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांसाठी हा अंदाज दिलासादायक मानला जात असून खरीप पिकांच्या पेरणीनंतर पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस मिळण्याची आशा आहे.

दरम्यान, जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानाचा पारा घसरला आहे. शुक्रवारी जळगावचे तापमान कमाल तापमान ३४.१ तर किमान तापमान २०.६ इतके होते. आता पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाचे वातावरण राहणार आहे. यामुळे तापमान ३४ ते ३६ अंशापर्यंत राहण्याचा अंदाज आहे. अंदाजानुसार २८ जून रोजी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. २९ व ३० जून रोजी किमान तापमान २२ अंश आणि कमाल तापमान ३५ अंश राहील. १ व २ जुलै रोजी किमान तापमान २१ अंश तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now