⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

जळगाव शहर मनपा : भाजप-बंडखोरांच्या वादात रखडली शिवसेना स्वीकृत सदस्याची निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ मार्च २०२२ । जळगाव शहर मनपातील राजकारण आणि नगरसेवकांचे तळ्यात-मळ्यात सर्वांनाच ठाऊक आहे. जळगाव मनपातील पक्षीय सदस्य संख्या लक्षात घेता भाजपच्या वाट्याला चार तर शिवसेनेच्या वाट्याला एक स्वीकृत सदस्यपद आलेले आहे. मनपातील सत्तांतर नाट्यानंतर भाजपच्या बंडखोर नगरसेवकांनी बहुमताचे पत्र देत स्वतःचा गटनेता जाहीर करीत भाजपच्या विद्यमान गटनेत्याला आव्हान दिले होते. भाजप आणि बंडखोरांचा गटनेता निवडीचा वाद न्यायालयात पोहचला असल्याने शिवसेनेच्या स्वीकृत नगरसेवकाची निवड रखडली आहे.

जळगाव शहर मनपात भाजपचे ५७ तर शिवसेनेचे १५ नगरसेवक निवडून आले होते. पक्षीय बलानुसार भाजपच्या कोट्यात ४ तर शिवसेनेला एक स्वीकृत सदस्यपद मिळाले होते. भाजपने कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, राजू मराठे, महेश चौधरी यांची तर शिवसेनेने अमर जैन यांची निवड केली होती. गेल्याच वर्षी भाजपचे नगरसेवक गळाला लावत शिवसेनेने सत्ता काबीज केली होती. मनपात सत्तांतर होताच शिवसेनेने अमर जैन यांच्याकडून राजीनामा घेत नवीन नियुक्तीच्या हालचाली सुरु केल्या होत्या. तोच नवीन गोंधळ सुरु झाला आणि सभागृह नेत्याचे पत्र घेत २७ नगरसेवकांच्या बळावर बंडखोरांनी नवीन गटनेता म्हणून ऍड.दिलीप पोकळे यांची निवड जाहीर केली. महापौर आणि मनपा आयुक्तांना देखील त्यांनी तसे पत्र दिले होते.

भाजप मात्र आपल्या गटनेत्यांवर ठाम होता. गटनेते भगत बालाणीच असून तेच पक्षाची दिशा ठरवतील अशी भूमिका भाजपने घेतली. भाजपकडून खंडपीठात गटनेता निवडीवर याचिका दाखल करण्यात आली. खंडपीठाने त्यावर सध्या कोणत्याही सदस्याने निवडीत भाग घेऊ नये अशा सूचना केल्या आहेत. मनपातील सदस्य निवडीसाठी सर्व पक्षाच्या गटनेत्यांची उपस्थिती आवश्यक असते. परंतु सध्या भाजपचा गटनेता कोण? हेच अधिकृत नसल्याने निवड होणे तूर्तास तरी शक्य नाही. गटनेता निवडप्रश्नी न्यायालयात कामकाज सुरु असल्याने गेल्या काही महिन्यांपासून मनपातील महिला व बालकल्याण समिती सदस्य, स्थायी समिती सदस्य आणि स्वीकृत सदस्य निवड रखडली आहे.

महापौर जयश्री महाजन यांनी मनपाच्या विधी सल्लागारांना पत्र पाठवीत सर्व बाजू न्यायालयाच्या लक्षात आणून देत सर्व निवडी रखडल्याने त्याचा शहराच्या विकासावर कसा परिणाम होतो आहे याबाबत न्यायालयात बाजू मांडण्याची विनंती केली आहे. न्यायालयात पुढील सुनावणीप्रसंगी मनपाची बाजू ऐकून घेत न्यायालयाने निकाल जाहीर केल्यास सर्व निवडी होणे शक्य आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक अद्याप पदावर असले तरी शिवसेनेच्या गोटात मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे. पुढील वर्षी येणारी निवडणूक लक्षात घेता स्वीकृतची माळ कुणाच्या गळ्यात पडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.