जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुलै २०२६ । जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीला आळा घालण्यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी मोठी कारवाई करत विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तब्बल ९५८.०७० किलो गांजाची कायदेशीर विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आणि एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या तरतुदींचे पालन करून हा अमली पदार्थ सुरक्षित पद्धतीने नष्ट करण्यात येत आहे.

ही कारवाई जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या अमली पदार्थ विरोधी गुन्ह्यांशी संबंधित आहे. त्यामध्ये चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील तीन गुन्ह्यांमधून ४३२.२४० किलो, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्यांमधून २६२.४३० किलो, एरंडोल पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातून १८२ किलो, जळगाव तालुका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून ५८ किलो आणि जामनेर पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून २२ किलो असा एकूण ९५८.०७० किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

या प्रकरणांपैकी काही गुन्ह्यांचा न्यायालयीन निकाल लागला असून काही प्रकरणे अद्याप न्यायप्रविष्ट आहेत. मात्र, न्यायालयाची परवानगी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर या अमली पदार्थांचा नाश करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस कठोर भूमिका घेत असून, भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी आणि जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन जिल्हा स्तरीय अंमली पदार्थ नाश समिती मधील सदस्य अपर पोलीस अधिक्षक, संदिप गावीत, पोलीस अपअधिक्षक (गृह) संजय गायकवाड तसेच अधिक्षक, कृषी विभाग, जळगांव यांचे प्रतिनीधी विकास बोरसे तसेच निरीक्षक वजन मापे गौतम बाविस्कर यांचे उपस्थितीत पो.नि राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव यांचे मार्गदर्शनाखाली स. फौ. संजय दोरकर, पोहेकों/संदिप पाटील, पोहेकों/संदिप चव्हाण पोहेकॉ/जयंत चौधरी, पोहेकॉ राहुल बैसाणे सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी केली आहे.









