⁠ 
शनिवार, एप्रिल 20, 2024

धानोरा ग्रामपंचायत प्रशासनाचा ढिम्म कारभार; ग्रामस्थांमध्ये संताप

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील मोठ्या गावांपैकी धानोरा हे एक गाव असून येथील लोकसंख्या दहा हजारावर गेली आहे. गावात गेल्या महिन्याभरापासून पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह आबालवृद्धांना रात्री बेरात्री हंडा घेऊन वणवण करावी लागते आहे. यावर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या ढिम्म कारभारावर रोष व्यक्त केला आहे.

धानोरा गावात महिन्याभरापासून भीषण पाणीटंचाई चा सामना करावा लागत आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी आठ ते नऊ कूपनलिका आहेत. परंतु त्यांचे पाणी पातळी खालावल्याने पाणी टाकीत जाण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात येते. तर कधी कूपनलिका खराब होतात तर कधी त्यांचा विद्युतपुरवठा खंडित केला जातो असे एक ना अनेक उत्तरे ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थांना देत असतात. गावात भीषण पाणीटंचाई जाणवत असून दहा बारा दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गावातील सार्वजनिक नळ बंद असल्याने गावाजवळील शेतातून ग्रामस्थ पाणी वाहताना दिसत आहेत.तसेच गावात ठिक ठिकाणी सार्वजनिक नळ बसविण्यात आले असून या ठिकाणी ग्रामस्थ पाणी भरत असतात. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून हे सार्वजनिक नळ बंद करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हे नळ बंद झाल्यास गावातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र हे सार्वजनिक नळ बंद करूनसुद्धा पाण्याची परिस्थिती जैसे थे असल्याने ग्रामपंचायतीने हेतुपुरस्कर गावात पाणी टंचाई निर्माण करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

ग्रामपंचायत चे टँकर जाते भाडोत्री

ग्रामपंचायतीच्या चौदावा वित्त आयोगाच्या निधीतून एक ट्रॅक्टर व टँकर घेण्यात आले आहे. गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्यावर सुद्धा ह्या टँकर द्वारे गावात पाणी पुरवले जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून हे टँकर भाडोत्री दिले जात असल्याचेही समजते.

पाणी भरण्यावरून महिलांची भांडणं

सार्वजनिक नळाला जर कधी कधी पाणी सुरू केले तर त्याठिकाणी महिलांची पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी जमून वादविवाद होत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने निर्माण झालेल्या पाणी टंचाई वर योग्य ते नियोजन करून गावातील पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्याची मागणी महिला वर्गातून केली जात आहे.