चोपड्यात आयसर गाडी अडवून चालकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; ६ संशयितांविरुद्ध गुन्हा

जून 14, 2026 6:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शहरातील मजरेहोळ फाट्याजवळ १४ जून २०२६ च्या मध्यरात्री एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आयसर गाडीच्या चालकाला काही तरुणांनी संगनमताने अडवून, गाडीत ‘गोवंश’ असल्याचा खोटा आरोप करत लोखंडी रॉड आणि दगडांनी बेदम मारहाण केली. या हिंसक प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

New Project 1 3

संग्राम परदेशी, आकाश संतोष भोई, मुकेश पंकज पाटील, कृष्णा प्रविण गोसावी, राहुल पाटील आणि पवन पाटील, अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

​नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार तबरेज सलीम खान (वय ४८, रा. बालसमद, जि. खरगोन) हे आपल्या आयसर गाडीने जात असताना, १४ जून रोजी रात्री १२:३० च्या सुमारास मजरेहोळ फाट्याजवळ त्यांना काही तरुणांनी अडवले. आरोपींनी गाडीचे टायर लोखंडी रॉडने फोडले आणि चालकाला गाडीत काय आहे, अशी विचारणा करत अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नाही तर, गाडीत ‘गोवंश’ असल्याचे खोटे आरोप करत आरोपींनी तक्रारदाराला लोखंडी रॉड, दगड आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून दुखापत केली आणि गाडीचेही नुकसान केले.

​या प्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories