जळगाव लाईव्ह न्यूज । अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलीस दलाने मोठी कारवाई करत एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमडी या घातक अमली पदार्थाची तस्करी उघडकीस आणली. या कारवाईत कारवाई करत 62.07 ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्स जप्त केले असून एका तस्कराला बेड्या ठोकल्या असून त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण ₹3 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

काय आहे कारवाई?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (31 जुलै) रात्री 10.40 वाजेच्या सुमारास एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ (FCI गोडाऊन), सेक्टर क्र. A-14 च्या समोरील रस्त्यावर पोलीस पथक गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका इसमाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्याच्याकडे मानवी शरीरास अत्यंत घातक असणारा ‘एमडी’ हा अमली पदार्थ आढळून आल्याने पोलिसांनाही धक्का बसला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान हयात खान (वय 36, मूळ रा. आडगाव, ता. जळगाव, सध्या रा. करीमनगर, फातिमा नगर, एमआयडीसी, जळगाव) असे आहे. तपासादरम्यान रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने हा अमली पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून 39.06 ग्रॅम एमडी (किंमत ₹1.96 लाख), 11 प्लास्टिक पिशव्यांमधील 9.10 ग्रॅम एमडी (किंमत ₹36 हजार) आणि 18 प्लास्टिक पिशव्यांमधील 13.91 ग्रॅम एमडी (किंमत ₹56 हजार) असा एकूण 62.07 ग्रॅम एमडी (एकूण किंमत ₹2.88 लाख) जप्त केला. याशिवाय रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन (₹20 हजार) आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (₹50 हजार) असा एकूण ₹3.58 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस फौजदार अतुल रघुनाथ वंजारी यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.











