जळगाव लाईव्ह न्यूज । 1 ऑगस्ट 2026 पासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या नव्या दरांची घोषणा करण्यात आली असून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 192 रुपयांची कपात करण्यात आली आहे. , ज्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

गेल्या काही महिन्यांत इराण-अमेरिका संघर्ष आणि होर्मुज खाडीत निर्माण झालेल्या तणावामुळे जागतिक बाजारात एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. गॅस प्रकल्पांवरील हल्ले आणि पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे तेल कंपन्यांवर आर्थिक ताण वाढला होता. त्याचा परिणाम म्हणून व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ करण्यात आली होती.

आता मात्र सरकारने व्यावसायिक ग्राहकांना दिलासा देत 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत 192 रुपयांची कपात केली आहे. इंडियन ऑयलच्या नव्या दरांनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत आता 2,738 रुपये झाली आहे. या निर्णयाचा फायदा हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरिंग व्यवसाय तसेच अन्य व्यावसायिक आस्थापनांना होणार आहे.
दुसरीकडे, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दरकपातीचा लाभ मिळालेला नाही. तसेच उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणाऱ्या एलपीजी सिलेंडरच्या अनुदानाबाबतही बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली असून संबंधित लाभार्थ्यांवर त्याचा परिणाम होणार आहे.












