जळगाव लाईव्ह न्यूज । चोपडा शहर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीच्या उद्देशाने बेकायदेशीर शस्त्रे बाळगण्याच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मामलदे गाव फाट्याजवळील शनि मंदिराजवळ धडक कारवाई केली. या धडक कारवाईत एका २४ वर्षीय तरुणाला गावठी पिस्तूल (कट्टा), मोटारसायकल आणि मोबाईलसह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले

पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, चुंचाळे रोडने एक तरुण बेकायदेशीर शस्त्र घेऊन जात आहे. या माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ हालचाली करत मामलदे फाट्या जवळील शनिमंदिर परिसरात दबा धरून सापळा रचला. काही वेळातच संशयास्पद वाटणाऱ्या एका मोटारसायकलस्वाराला पोलिसांनी थांबवून त्याची कसून चौकशी केली.

पोलिसांनी थांबवलेल्या संशयिताने आपले नाव विनोद वसंतराव पावरा (वय २४, रा. अंमलवाडी, ता. चोपडा, जि. जळगाव) असे सांगितले. पोलिसांना त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे स्टील बनावटीचा गावठी कट्टा (पिस्तूल) आणि मॅगझीन आढळून आले. पोलिसांनी तात्काळ त्या शस्त्राची तांत्रिक तपासणी करून ते जप्त केले.
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ३०,००० रुपये किमतीचा गावठी कट्टा अंदाजे ४५,००० रुपये किमतीची काळ्या रंगाची दुचाकी व १०,००० रुपयाचा मोबाईल असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही यशस्वी कारवाई पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक युवराज वाळुंज, हवालदार महेंद्र साळुंखे व पंकज ठाकूर यांच्या पथकाने केली.







